जिंतूर तालुक्यातील अकोली पुलावर घडली घटना;मयत गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी
प्रतिनिधी, अहमद अन्सारी (पाथरी/ परभणी):-
देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अकोली पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील पाच भाविक उज्जैन येथील धार्मिक तीर्थस्थळी देवदर्शनासाठी गंगाखेडहून जिंतूरमार्गे संभाजीनगरकडे जात होते. जिंतूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील अकोली पुलाजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. घुगे व चालक पवार यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मुद्दसीर व रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी तपासणी केल्यानंतर बालाजी आश्रोबा औटी वय २८ वर्षे, रा. खडकपुरा, बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे वय ३० वर्ष, रा. तारुमोहल्ला, कृष्णा बालाजी गुट्टे वय २८ वर्ष रा. कोद्री रोड, रोहन संजय राठोर वय २७ वर्षे, रा. लक्ष्मीनगर या चौघांना मृत घोषित केले. तर गोपाळ गणेश रोकडे वय २८ वर्षे रा. खडकपुरा हा अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बिट जमादार दत्तात्रेय गुंगाणे, मेजर थोरवे व पोलीस वाहनचालक पैठणे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घटनास्थळ व रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने गंगाखेड व जिंतूर परिसरात शोककळा पसरली आहे. जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रमोद पारवे, डॉ. मोहिनी हरकळ, रुग्ण कक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन केला. बिट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
