पवित्र रमजान महिन्यात स्वच्छता करण्याची मागणी मुस्लिम सेवा संघातर्फे न. प. प्रशासनाला देण्यात आले निवेदन

कळमनुरी(तालुका प्रतिनिधी):- येत्या 18 फेब्रुवारीपासून मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात शहरात नियमित स्वच्छता करावी, दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच बंद असलेले पथदिवे दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत, अशी मागणी मुस्लिम सेवा संघातर्फे मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. तसेच नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर रोजा (उपवास) ठेवतात. तसेच पहाटे व रात्री उशिरापर्यंत नमाज पठण, विशेष प्रार्थना व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे रमजान महिन्यात शहरात, विशेषतः मशिदीच्या परिसरात स्वच्छता करण्यात यावी, एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी मुस्लिम सेवा संघातर्फे करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मुस्लिम सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष निहाल कुरेशी, जिल्हाध्यक्ष शेख आमेर, शेख महेबूब बाबा, अ‍ॅड. इलियास नाईक, मुजीब पठाण, एहसान सिद्दीकी, शेख अय्युब, मोहम्मद परवेज, एजाज बागबान, शारेक रजा, अन्वर नाईक, शेख वाजेद, मुजम्मिल अहमद, मोहम्मद रफीक, अलीम कुरैशी, साजिद राज, शेख मोजीम यांच्यासह ईतर मुस्लिम सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *