अयुब पठाण यांचा पुढाकार
कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक तथा गटनेते अय्यूब पठाण यांनी स्वतः उपस्थित राहून स्वच्छता कर्मचाऱ्यां मार्फत प्रभागातील अनेक परिसरात स्वच्छता करून घेतली आहे. यावेळी अय्यूब पठाण यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ८ मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून प्रभागातील सर्व परिसर स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच येणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच नगरपरिषद कार्यालयात सर्वसाधारण सभा पार पडणार असून या मध्ये शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांवर चर्चा होणार आहे. शहरात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल, असा विश्वास अय्यूब पठाण यांनी व्यक्त केला. या स्वच्छता अभियान मुळे मात्र नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून येणाऱ्या काळात ही शहरात न. प. ने नागरिकांच्या मूलभूत सुविधा कडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
