कळमनुरी तालुक्यातील भोसी ग्रामपंचायतचे बेकायदेशीर शाळेचे बांधकाम बंद करण्याचे कळमनुरी न्यायालयाचे आदेश

कळमनुरी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश मा.एस.पी.पांडव साहेब यांनी दि.१४ जुलै २०२६ रोजी एकतर्फा तात्पुरता मनाई हुकमाचा आदेश करून भोसी ग्रामपंचायतचे सरपंच विजय शामराव अवचार, ग्रामसेवक संतोष शिंदे ,गटविकास अधिकारी अमित मुंडे यांनी वादी सुरेश विठ्ठलराव राऊत,अमोल विठ्ठलराव राऊत,रूखमाबाई विठ्ठलराव राऊत,सौ.व्दारकाबाई बालाजी जाधव यांच्या मालकी व ताब्यातील शेत गट क्रमांक २१३ क्षेत्रफळ ६० जमिनीत शाळेच्या संरक्षण भिंतीचे दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी बेकायदेशीरपणे चालू केलेले बांधकाम त्वरित बंद करण्याचे आदेश दिले.
भोसी ग्रामपंचायतचे सरपंच विजय शामराव अवचार व ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी वादींच्या कायदेशीर मालकी व ताब्यातील शेत गट क्रमांक २१३ क्षेत्रफळ ६० जमिनीत मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग कळमनुरी यांच्याकडून मोजणी न करता दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जेसीबी मशीनने खड्डे करून लोखंडी गजाचे बीम व कॉलम तयार करून आरसीसीचे शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम चालू केले होते. त्यावेळी वादी सुरेश राऊत व अमोल राऊत यांनी त्यांच्या मालकीच्या शेतातील बांधकाम थांबविण्याची विनंती केली.परंतु सरपंच व ग्रामसेवक यांनी वादीचे ऐकले नाही.वादींनी दुसऱ्या दिवशी दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी कळमनुरीचे गटविकास अधिकारी अमित मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून भोसी ग्रामपंचायतीचे बेकायदेशीर बांधकाम बंद करण्याचे सरपंच व ग्रामसेवकांना सूचना करण्याची विनंती केली परंतु त्यांनी सुद्धा टाळाटाळ केली.
शेवटी वादींनी कळमनुरी येथील प्रसिद्ध वकील ॲड.रवि शिंदे यांच्या मार्फत दिनांक १३ जुलै २०२६ रोजी विद्यमान दिवाणी न्यायालय कनिष्ठस्तर कळमनुरी यांच्या न्यायालयात सरपंच विजय शामराव अवचार ,ग्रामसेवक संतोष शिंदे व गटविकास अधिकारी अमित मुंडे यांच्या विरुद्ध दिवाणी दावा क्रमांक १०३/२०२६ दाखल केला त्यावर कळमनुरी न्यायालयाचे दिवाण न्यायाधीश मा. एस.पी.पांडव साहेब यांनी सर्व कागदपत्रे बघून व युक्तिवाद ऐकून दिनांक १४ जुलै २०२६ रोजी आदेश करून वादीच्या मालकी व ताब्यातील शेतातील अनाधिकृत बेकादेशीर शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम त्वरित बंद करण्याचे आदेश भोसी ग्रामपंचायतचे सरपंच विजय शामराव अवचार ,ग्रामसेवक संतोष शिंदे व कळमनुरीचे गटविकास अधिकारी अमित मुंडे यांना दिले आहेत अशी माहिती व न्यायालयीन आदेशाची नक्कल वादीचे वकील ॲड.रवि शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *