कापूस सघन लागवड तंत्रज्ञान महत्व; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 परभणी (प्रतिनिधी ) अहमद अन्सारी :- महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण, प्रकल्प उपसंचालक आत्मा अभिषेक घोडके व तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. 20 जुलै रोजी रेणाखळी येथे आत्मा अंतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कापूस पिकातील गळफांदी काढण्याचे महत्त्व आणि दादा लाड  लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल दलाल यांनी सघन लागवड व दादा लाड लागवड तंत्रज्ञानाची माहिती देत गळफांदी काढण्याचे प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक करून दाखवले.सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कापूस पिकामध्ये योग्य लागवड पद्धती आणि झाडाची वाढ समजून घेतल्यास अधिक उत्पादनासह दर्जेदार कापूस मिळू शकतो. कपाशीमध्ये दोन प्रकारच्या फांद्या असतात. त्यापैकी गळफांदी ही तुलनेने अनुत्पादक, तर फळफांदी ही उत्पादनक्षम असते. दादा लाड तंत्रज्ञानामध्ये लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी अनुत्पादक गळफांदी काढली जाते. तसेच लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी किंवा झाडाची उंची सुमारे साडेतीन फूट झाल्यावर शेंडा खुडला जातो.या तंत्रज्ञानामुळे झाडातील अन्नद्रव्यांचा पुरवठा फळफांद्यांवरील बोंडांच्या वाढीसाठी अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे बोंडे वजनदार होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तसेच गळफांदी काढल्याने आणि शेंडा खुडल्याने पिकात अनावश्यक दाटी होत नाही. परिणामी बोंडसड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकाची गुणवत्ता सुधारते. शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करत अधिक उत्पादन मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांनी सांगितले की, कापूस पिकातून अधिक उत्पादन आणि दर्जेदार बोंडे मिळविण्यासाठी गळफांदी काढणे हे अत्यंत महत्त्वाचे पीक व्यवस्थापनाचे तंत्र आहे. सघन लागवड आणि दादा लाड  तंत्रज्ञान हे आशादायी तंत्रज्ञान असून शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करून कापूस उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका उपतंत्रज्ञान व्यवस्थापक रमेश सिरस यांनी केले. कार्यक्रमास गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

ReplyForward

Add reaction

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *