परभणी प्रतिनिधी, (अहमद अन्सारी):- जात, धर्म, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीचा कोणताही भेद न करता प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे आणि आनंदात सामील होणे, हीच मानवतेची खरी ओळख आहे. समाजात सलोखा, शांतता आणि सहअस्तित्व टिकवण्यासाठी मानवता धर्माचा स्वीकार करणे हीच खरी धर्मनिष्ठा असल्याची शिकवण प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दिली. याच मानवतेच्या संदेशाला अनुसरून जमात-ए-इस्लामी हिंदच्या युवा संघटना मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, शाखा मानवत यांच्या वतीने प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी (दि. २८) पेठ मोहल्ला परिसरातील मरकस मस्जिद येथे सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे अध्यक्षपद शेख समीर यांनी भूषविले. या शिबिराला मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, मानवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक शेख आशिक हुसेन, पोलीस कर्मचारी अनिस कौसडीकर, सय्यद उमर, नगर अभियंता सय्यद अन्वर, नगरसेवक तसेच पाथरी येथील समाजसेवक गुलशेर खान, नियामत खान, मोहम्मद बिलाल बागवान आदींनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आहात बेलदार, सरफराज सय्यद, सलीम सर बागवान, सय्यद इकबाल सिद्दीक बागवान, अरबाज बेलदार, कलीम खान यांनी परिश्रम घेतले. तसेच परभणी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे पंढरीनाथ ठाकूर, कल्पना खंदारे, आकाश बगाटे, एजाज अन्सारी, रामा ढगळे, कपिल भरड, हमीद सिद्दिकी, रोमान शेख आदी उपस्थित होते. या वेळी नजात पठाण यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मानवतेची, बंधुभावाची आणि गरजूंच्या मदतीची शिकवण दिली. त्याच विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. रक्तदानातून एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांना समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करावे. या शिबिराला प्रत्यक्ष भेट देऊन प्रोत्साहन देणारे मान्यवर, रक्तदाते, परभणी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे अधिकारी-कर्मचारी तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. भविष्यातही मानवतेच्या सेवेसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील,” अशी प्रतिक्रिया नजात पठाण सर यांनी दिली.
मानवत येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश; ११५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग