तहसीलदार नितीन गर्जे यांना कारणे दाखवा नोटीस

‘महाराजस्व अभियान’ शिबिरात शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलल्याने कारवाई.

परभणी प्रतिनिधी (अहमद अन्सारी) :-
विधानसभा मतदार संघस्तरीय शासकीय कार्यक्रम असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” दरम्यान शिवसेना पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी येथे समोर आला आहे. या गंभीर राजशिष्टाचार भंगाप्रकरणी पाथरीचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संगिता चव्हाण यांनी पाथरीचे तहसीलदार नितीन गर्जे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिसीमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रेणुका मंगल कार्यालय येथे मंगळवार २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता विधानसभा मतदार संघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले होते. या शासकीय शिबिराच्या नियोजनात आणि निमंत्रणात गंभीर त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. राजशिष्टाचाराचा गंभीर भंग उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार, या शिबिराचे रीतसर निमंत्रण स्थानिक लोकप्रतिनिधींना देणे बंधनकारक होते. मात्र, नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांना हे निमंत्रण पत्र मिळालेच नाही. याशिवाय, परभणी हिंगोली विधानपरिषद मतदार संघाचे आमदार मा. सईद खान व इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांना या जाहीर कार्यक्रमाचे निमंत्रण जाणीवपूर्वक दिले नसल्याचे समोर आले आहे. २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे डावलणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा राजशिष्टाचार भंग आहे, असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटिसीत नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार नितीन गर्जे यांनी ही नोटीस मिळताच २४ तासांच्या आत स्वतः प्रत्यक्ष हजर राहून याबाबत लेखी खुलासा सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास, तहसीलदारांना याविषयी काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *