हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

हिंगोली, दि. 25 (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात (दि. 25) सायंकाळी 6.49 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंप मापक केंद्रात या धक्क्याची 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण येथे असून तो भूगर्भात सुमारे 5 किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *