नागरिकाकडून उद्या न.प.समोर ढोल बाजाओ आंदोलन
कळमनुरी (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कळमनुरी नगरपालिकेच्या अकार्यक्षमतेने कळस गाठला असून शहरातील अनेक भागात अस्वच्छता पसरली आहे तसेच नाल्यांची साफसफाई होत नसल्याने पावसाचे पाणी पडताच नालीतील गटारगंगा रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. नगरपालिकेच्या या गलथान कारभारा विरुद्ध नागरिक त्रस्त झाले असून नगरपालिका प्रशासनाला जागृत करण्यासाठी शहरातील नागरिकाकडून उद्या 13 ऑगस्ट रोजी नगरपालिका कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने गाळले गेलेल्या नाल्यातून वाहते पाणी जाणे दुरापास्त बनले आहे त्यामुळे नालीतील घाणेरडे पाणी हे रस्त्यावरून वाहत आहेत याबाबत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही नगरपालिकेला याचे सोयरसुतक नाही तसेच जनतेच्या आरोग्याशी न प. प्रशासनाला काहीही घेणे देणे नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार करीत आहेत. तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नाविषयी त्यांचा काडीचाही संबंध नसल्याचे दिसून येते यामुळे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 13 ऑगस्ट रोजी शहरातील नागरिकाकडून न. प. कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाद्वारे शहरातील विविध समस्या न.प. प्रशासनासमोर मांडून प्रशासनाला जागृत करण्यात येणार आहे. तरी मात्र निगरघट्ट असलेल्या न. प. प्रशासनाला नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नाविषयी जाग येईल का? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.