परभणी, प्रतिनिधी (अहमद अन्सारी) :- पाथरी तालुक्यातील जायकवाडी वसाहत परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७४ हजार ७८० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. १८) उघडकीस आली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी वसाहत येथील रहिवासी ज्ञानेश्वर सोपानराव नखाते (वय ४६) हे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.
यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. या प्रकरणी ज्ञानेश्वर नखाते यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत. दरम्यान, संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
news website