(परभणी प्रतिनिधी अहमद अन्सारी):-
आय. आय. टी. मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या दुर्दैवी मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, तसेच जातीय छळाच्या गंभीर आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.
साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांनी गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना जातीय अपमान, शिवीगाळ आणि मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. साहिलने पहिल्या सेमिस्टरमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तपास पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी परीक्षेत कॉपी केल्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर IIT मुंबई प्रशासनाने तपास पूर्ण होण्यापूर्वी अशा प्रकारे निष्कर्ष मांडणे अयोग्य असल्याचे मान्य करून माफी मागितल्याचे तसेच संबंधित प्राध्यापकाला निलंबित केल्याचे समोर आले आहे. एका विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर केवळ माफी आणि निलंबन करून हा विषय संपवता येणार नाही. साहिल वाकोडे यांच्या मृत्यूमागील सत्य समोर येणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली. निवेदनात साहिल यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, जातीय छळ व मानसिक त्रासाच्या आरोपांची सखोल चौकशी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, तपास पूर्ण होण्यापूर्वी मृत विद्यार्थ्यावर दोषारोप करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, कुटुंबीयांना आर्थिक व शासकीय मदत तसेच देशातील IIT, केंद्रीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाविरोधात स्वतंत्र व पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षणाच्या परिसरात जातीय अपमान, भेदभाव किंवा मानसिक छळाला कोणतीही जागा असता कामा नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. शासनाने या प्रकरणात ठोस आणि समाधानकारक कार्यवाही न केल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन देताना सुहास पंडित, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभाग; प्रा. तुकाराम साठी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग; रवींद्र सोनकांबळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते; सतीश भिसे, जिल्हाध्यक्ष, भीमशक्ती संघटना; राजेश रेंगे, मीडिया काँग्रेस तालुकाध्यक्ष; ज्ञानेश्वर वाघमारे, तालुकाध्यक्ष, ओबीसी विभाग; प्रसाद डुकरे पाटील, युवक काँग्रेस आदी उपस्थित होते.
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; जातीय छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी