कळमनुरी (मुजीब पठाण) कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणाली सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते तथा नगरसेवक पठाण अयुब खान, नगरसेवक शेख खाजा बागवान, नगरसेविका पठाण अवेस खान यांनी पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कडे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी जि. हिंगोली येथे कळमनुरी शहरातील विवाह नोंदणी करण्यात येत असून रुग्णालयाकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. परंतू सदर रुग्णालयात ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ ऑफलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्राआधारे आधारकार्डावरील नाव दुरुस्ती करणे व इतर अनेक अडचनी येत आहेत. सध्या ऑनलाईनच्या काळात ऑफलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्रामुळे अनेक अडचनींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत अनेकदा संबंधीत अधिकाऱ्यांशी विचारणा केली व लवकरात लवकर ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. परंतू कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही व याबाबत वरिष्ठांकडे मागणी करा असे सांगण्यात आले. तरी आपणास विनंती की, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथुन ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबत मा. संचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह (राज्यस्तर) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना सुचीत करण्यात यावे व ऑनलाईन सेवा प्रणाली सुरु करण्यात यावी व नागरीकांची अडचण दुर करावी अशी मागणी करण्यात आली असून निवेदनाच्या प्रतिलिपी संचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह (राज्यस्तर) महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली, जिल्हा शल्यचिकित्सक हिंगोली, अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी यांना देण्यात आली आहे.
कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणाली सुरु करण्याची मागणी