
(सय्यद अजहर):- आगामी गणपती व इतर सण उत्सवच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी येथील तहसील कार्यालयातील ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात आज पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, मौलाना, तसेच पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग घेतला. सदरील बैठकीत विविध अडचणी व उपायोजना याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना बब्बू मौलाना यांनी मागणी केली की गणेश उत्सवाच्या काळात एकही दिवस विद्युत पुरवठा बंद न झाला पाहिजे तसेच नंदकिशोर तोष्णीवाल यांनीही विविध उपाय योजना सुचवल्या. त्याचप्रमाणे गणेश मंडळांनीही आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा म्हणाले की गणेश मंडळांनी डी जे चा वापर टाळावा यामुळे ध्वनी प्रदूषण तसेच इतर समस्या उद्भवतात, गणेश मंडळांनी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पोलीस प्रशासन याबाबत कठोर भूमिका घेऊन पूर्ण लक्ष ठेवणार आहे कायद्याची पायमल्ली होणार नाही याची दक्षता सर्व गणेश मंडळांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या बैठकीत पोलीस अधीक्षक श्रमिक लोढा यांच्यासह पोलीस उपाधीक्षक नारायण देशमुख, तहसीलदार जीवक कुमार कांबळे, पोलीस उपाधीक्षक तथा कळमनुरी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज मयूर रसाळ, मदन गव्हाणे, संदीप मोदे, शरद मरे, पंचायत समितीचे अण्णा , नगरपालिकेचे नदीम रजवी आदी उपस्थित होते. तसेच शांतता कमिटीची बैठक यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत माखणे, नामदेव कोटकर, गजानन होळकर, विलास बांगर, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.