मदीना मस्जिद परिसरातील गटार व अस्वच्छतेची कायमस्वरूपी निवारण करण्याची मागणी

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- मदीना मस्जिद परिसरातील गटार व अस्वच्छते ची कायमस्वरूपी निवारण करण्याची मागणी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. न.प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील मदीना मस्जिद परिसरात अनेक दिवसांपासून गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी, चिखल व घाण रस्त्यावर साचून अत्यंत अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली आहे. ही समस्या वारंवार उद्भवत असून केवळ साफसफाई करून काही दिवसांत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे या समस्येवर तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या मार्गाने दररोज पाच वेळा नमाजासाठी जाणारे मुस्लिम बांधव, शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. इस्लाम धर्मानुसार नमाजपूर्वी शरीर व कपडे स्वच्छ (पाक) असणे अत्यावश्यक असते. या साचलेल्या घाणीचे अथवा नाल्यातील सांडपाण्याचे थेंब जरी कपडयांवर उडाले तरी संबंधित व्यक्तीला पुन्हा स्वच्छता करूनच नमाज अदा करावी लागते. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून मोठा मानसिक व धार्मिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय या अस्वच्छते मुळे डास, माशा, दुर्गधी व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून घसरून अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
म्हणून मदीना मस्जिद परिसरातील गटार व जलनिस्सारण व्यवस्थेचा कायमस्वरूपी तांत्रिक उपाय करण्यात यावा, तुंबलेली गटारे, गाळ व कचरा तात्काळ हटवून आवश्यक त्या ठिकाणी नाल्याची पुनर्बाधणी व दुरुस्ती करण्यात यावी, रस्त्यावर सांडपाणी येणार नाही, अशी शाश्वत ड्रेनेज व्यवस्था करण्यात यावी, परिसरात नियमित स्वच्छता, फॉगिंग व निर्जतुकाकरण करण्यात यावे, या कामास सार्वजनिक आरोग्य व धार्मिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे काम म्हणून प्राधान्य देऊन तातडीने कायमस्वरूपी कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे तसेच सदर प्रश्न हा केबळ स्वच्छतेचा नसून नागरिकांच्या आरोग्याशी, सुरक्षिततेशी तसेच हजारो मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना व श्रद्धेशी निगडित आहे, त्यामुळे या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, असे हि निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील निवेदनावर युवक काँग्रेस चे मा. प्रदेश सचिव सादात पठाण व युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष फैसल खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *