साधी राहणी, उच्च विचारसरणी अन् सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारे नेतृत्व
(डॉ. तौसिफ शेख)
कळमनुरी : समाजसेवा ही केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतून सिद्ध करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वडिलांकडून मिळालेला जनसेवेचा वारसा, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याची ध्येयवेडी भूमिका यामुळे त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनाचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. २१ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा डॉ. मिर्झा यांना आपल्या वडिलांकडून मिळाली. याच प्रेरणेतून युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांच्या सेवेसाठी प्रभावी व्यासपीठ ठरावे, या उद्देशाने त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी या माध्यमातून अनेक नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वक्फ कार्यालयाची निर्मिती केली.त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. या काळात त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याबरोबरच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्षविस्तारासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करत पक्षाने त्यांना विधान परिषदेचे आमदार म्हणून संधी दिली. पुढे त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची आणि कार्यक्षमतेची दखल घेत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. विविध पदांवर काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेली नाळ कायम जपली. पद मोठे झाले, जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र सामान्य माणसाशी असलेले त्यांचे नाते कधीही दुरावले नाही.
शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा ध्यास
मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर डॉ. मिर्झा यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून संस्थेच्या विस्ताराला चालना दिली. अल्पसंख्याक, मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे भविष्य घडविणे, या उद्देशाने त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले. गोरगरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात आली. शिक्षणाची दारे समाजातील प्रत्येक घटकासाठी खुली झाली पाहिजेत आणि शिक्षणातून समाजाची प्रगती साधली पाहिजे, हा त्यांचा सातत्यपूर्ण दृष्टिकोन राहिला आहे.
१९ वर्षे सामूहिक विवाहाची सोहळ्याची सामाजिक बांधिलकी.
समाजकार्यातील त्यांच्या कार्याची आणखी एक उल्लेखनीय बाजू म्हणजे गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी गेल्या १९ वर्षांपासून आयोजित करण्यात येणारे सामूहिक विवाह सोहळे. या उपक्रमातून तब्बल ८३५ गोरगरीब मुलींचे विवाह पार पडले आहेत. विवाहाचा वाढता खर्च पेलणे अनेक कुटुंबांसाठी आव्हानात्मक असताना सामूहिक विवाहाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार देण्याचे काम या उपक्रमातून झाले आहे. समाजातील नवोदित कवींना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या साहित्यिक गुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी कवी संमेलनांचे आयोजन केले. सामाजिक कार्यासोबत साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका त्यांच्या व्यापक सामाजिक दृष्टिकोनाची साक्ष देते.
सामान्य माणूस केंद्रस्थानी.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक कामांमध्ये व्यस्त असतानाही नागरिक आपली समस्या घेऊन त्यांच्याकडे आला तर ती ऐकून घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कोणताही कर्मचारी अथवा सामान्य नागरिक आपल्या अडचणी घेऊन आला, तरी त्याला शक्य ती मदत करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.
स्पष्टवक्तेपणा, साधी राहणी, मितभाषी स्वभाव, उच्च विचारसरणी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. पद, प्रतिष्ठा आणि राजकीय जबाबदाऱ्या असूनही सामान्य माणसाशी असलेली त्यांची जवळीक कायम राहिली आहे. त्यामुळेच विविध सामाजिक घटकांमध्ये त्यांनी आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे.
सेवेचा प्रवास असाच अखंड सुरू राहो…
डॉ. वजाहत मिर्झा यांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रवास हा पदांच्या मालिकेपेक्षा सेवेच्या संकल्पनेशी जोडलेला प्रवास आहे. शिक्षण, सामाजिक बांधिलकी, गरजूंची मदत सामूहिक विवाह, साहित्य-संस्कृतीला प्रोत्साहन आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न या विविध माध्यमांतून त्यांनी आपला सामाजिक ठसा उमटविला आहे.
२१ सप्टेंबर या त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. वजाहत मिर्झा यांना कोटी कोटी शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि शिक्षण व समाजसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे त्यांचे कार्य यापुढेही अविरत सुरू राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.