कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- कावड यात्रा व श्रावणाच्या पार्श्वभूमीवर उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याच्या सूचना नगराध्यक्षा आश्लेषा पाटील यांनी मासिक सर्वसाधारण सभेत दिल्या. पवित्र श्रावण महिना सुरू आहे. तसेच श्रावण महिन्यानिमित्त दुसऱ्या सोमवार ला दरवर्षी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली भव्य कावड यात्रा काढण्यात येते. याही वर्षी मोठ्या उत्सवात सोमवार 24 ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रा निघणार आहे या पार्श्वभूमीवर उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. माता – भगिनींसह लाखो संख्येने शिवभक्त शिवभक्तांच्या उपस्थितीत शंभू चिंचाळेश्वर महादेव मंदिरात महादेवाची भव्य कावड यात्रा दर्शनासाठी जात असते. सदर कावड शहरातील मुख्य रस्त्यावरून जात असते. शहरातील मुख्य रस्त्यालगत ठिकठिकाणी सुरू असलेल्या उघड्यावरील मांस विक्रीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उघड्यावर मांस विक्री होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, या मार्गावरून जाणाऱ्या शिवभक्तांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः कावड यात्रेदरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने अशा प्रकारच्या विक्रीमुळे भाविकांच्या भावना दुखावण्याची तसेच शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या गंभीर बाबीची दखल घेत नगराध्यक्षा आश्लेषा आर. आर. पाटील यांनी मंगळवारी नगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. मुख्य रस्त्यालगत उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नोटीस बजावून उघड्यावरील मांस विक्री तातडीने बंद करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. श्रावण महिना आणि कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना सुरक्षित व दुर्गंधीमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा आहे.
news website