( सय्यद अझहर)
औंढा तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायती मधील बोगस कामे, शासकीय निधीचा गैरवापर आणि भीषण पाणी टंचाईकडे व इतर घोटाळ्या संबंधित प्रेमकुमार जियालाल जयस्वाल यांनी पुराव्यांसह वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली मात्र या प्रकरणी सारवासारव होत असल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणी दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात २४ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात आली असून तक्रारदार प्रेमकुमार जियालाल जयस्वाल यांनी पुराव्यांसह केलेल्या सततच्या पाठपुराव्या नंतर ही कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी वसमतच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र त्या चौकशीत अनेक त्रुटी ठेवून तक्रारदाराला कोणतीही सूचना न देता अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला आहे. त्यावर समाधान न झाल्याने त्यांनी जी.प. सीईओं कडे फेरचौकशी ची मागणी केली होती. तक्रारीत प्रामुख्याने कागदावर बोगस कामे दाखवून निधी हडप करणे, विकास कामांसाठी आलेला लाखो रुपयांचा निधी चुकीच्या पद्धतीने वापरणे, प्रत्यक्ष कामे न करता बिले उचलणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सी ई ओ गायकवाड यांनी वरिष्ठ पातळीवरून पारदर्शक फेरचौकशी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. यात ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार, विकासकामांचा दर्जा आणि पाणीपुरवठ्याचा निधी याची बारकाईने तपासणी होणार आहे. या सुनावणीस अर्जदार, ग्रामसेवक, सरपंच आणि तपास अधिकारी उपस्थित होते. आता या फेरचौकशीत काय निष्पन्न होते आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी मात्र सदर फेरचौकशी निःपक्ष पणे पार पडते की पुन्हा पुढे पाठ मागे सपाट या उक्ती प्रमाणे वरवर चौकशी होते हे मात्र चौकशी अंतीच कळेल.
news website