वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

कळमनुरी (अनोज वायकोळे) तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामीण भागात वन्यप्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत अनेक गावातील शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या त्रासाबद्दल वन विभाग यांना कळविले असून सुद्धा या गंभीर प्रकाराकडे मात्र सदरील विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या शेतातील पिके जीवापाड जपत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वन्यप्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालून अनेक पिकांची नासाडी सुरू केली आहे त्यामुळे डोळ्यादेखत प्रचंड होत असलेल्या नुकसानीने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. या गंभीर प्रकरणी तालुक्यातील शेतकरी वर्ग वन विभागाच्या विरोधात उपोषणास बसण्याच्या तयारीत आहे. वानर, माकडे, रोही, रानडुक्कर, हरीण इत्यादींचे कळपच्या कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहेत. दिवसाच्या वेळी तरी शेतकरी कसेबसे आपले पिकाचे संरक्षण करीत आहे मात्र रात्री बेरात्री या प्राण्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे त्यामुळे सकाळी शेतात जाऊन पाहिले असता सर्वत्र नासधूस नजरेस पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. या गंभीर प्रकरणी वन विभागाने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *